नवी दिल्ली : दिल्लीत एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. जुन्या राजेंद्र नगर येथील राव आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्यानंतर मृतांचा आकडा आता तीनवर पोहचल्याची माहिती समोर येत आहे. रात्री उशिरापर्यंत एनडीआरएफच्या पथकाचं बचावकार्य सुरू होतं. दिल्ली सरकारनं या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत.
दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसानंतर कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तळघरात पाणी साचलं होतं. या तळघरात तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला असून बचाव मोहिमेचा एक भाग म्हणून तळघरात भरलेलं पाणी पंपांच्या सहाय्यानं बाहेर काढलं जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने तीन विद्यार्थी अडकल्याची माहिती दिल्ली अग्निशमन विभागाला संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मिळाली होती. सुरुवातीला तळघरात पाणी साचल्यानं दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता, तर एक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्याही विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
दिल्ली अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितलं की, आम्हाला संध्याकाळी सव्वा सात वाजता घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन विभागाच्या ५ गाड्या घटनास्थळी पाठवल्या. आम्ही पंप लावून पाणी बाहेर काढलं. सुरुवातीला आम्ही दोन विद्यार्थिनींचे मृतदेह बाहेर काढले. एकूण तीन विद्यार्थी पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली होती. सुरुवातीला त्यापैकी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिसऱ्या विद्यार्थींनीचा शोध घेण्यात आला. घटनेच्या वेळी तळघरात 30 विद्यार्थी होते, त्यापैकी तीन विद्यार्थी पाण्यात अडकले होते. या घटनेमुळे संतप्त झालेले विद्यार्थी एमसीडीविरोधात आंदोलन करत आहेत.
नेमकं काय घडलं?
विद्यार्थ्याने सांगितलं की, आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ग्रंथालय बंद करण्यात येतं. त्यावेळी आम्ही ३५ विद्यार्थी होतो. आम्हाला तातडीने बाहेर निघण्यास सांगितलं. त्यामुळे विद्यार्थी तळघरातून बाहेर येत होते. याचवेळी तळघरात प्रचंड वेगाने पाणी आल्याने त्यामध्ये काही विद्यार्थी अडकले. अवघ्या दोन ते तीन मिनिटांत तळघर पाण्याने गच्च भरलं. पाणी खराब असल्यामुळे काहीच दिसत नव्हतं.