नवी दिल्ली: भारतात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले. आज देशात तीन वेगवेगळ्या भागांना भूकंपांचे धक्के बसले. सुरुवातीला कर्नाटक, नंतर छत्तीसगड आणि शेवटी उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. शेजारील पाकिस्तान आणि म्यानमारमध्येही भूकंपाचे हलके धक्के जाणवले.
नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार, कर्नाटकातील बेल्लारी येथे मंगळवारी दुपारी 2:13 वाजता सौम्य भूकंप झाला, ज्याची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. त्यानंतर छत्तीसगडच्या जांजगीर चंपा येथे भूकंप झाला. 3:40 वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी होती. अवघ्या 16 मिनिटांनंतर म्हणजे दुपारी 3:56 ला उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भूकंप झाला, ज्याची तीव्रता 2.4 रिश्टर स्केल होती.
पाकिस्तान-म्यानमारमध्ये भूकंप किती तीव्र होता?
पाकिस्तानातही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल होती. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार, पाकिस्तानमध्ये दुपारी 4:16 वाजता भूकंप झाला. म्यानमारमध्ये बुधवारी सकाळी ८.५२ वाजता ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के बसले.
तीन दिवसांत तिसरा भूकंप :
याआधी भारतात सोमवारी दुपारी १२.४५ वाजता भूकंप झाला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू चीनमध्ये होता. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात याचे जोरदार धक्के जाणवले. मात्र, कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. यानंतर मंगळवारीही भारतात भूकंप झाला. मंगळवारी संध्याकाळी ६.५१ वाजता अंदमान निकोबारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल एवढी होती.