पाटणा : बिहार मधून एक संतापजनक घटना घडली आहे. एका युवकाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकून अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बिहारच्या अररिया येथील धक्कादायक घटना घडली आहे. या युवकावर बाईक चोरीचा आरोप असल्याचे व्हिडिओतील संवादावरुन दिसून येत आहे. चोरीच्या आरोपातून युवकास पकडल्यानंतर स्थानिकांनी ही शिक्षा दिली. मात्र, त्यांचं हे कृत्य माणूसकीच्या साऱ्या सीमा पार करणारे असल्याचे म्हणत नेटीझन्कडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशीही मागणी केली जात आहे.
सोमवार 26 ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची खात्री केल्यानंतर याबाबत माहिती दिली. बिहारच्या अररिया येथील ही घटना असून चोरीच्या आरोपात पकडलेल्या युवकासोबत हे कृत्य केलं गेलं आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर, इतरांच्याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. तसेच कारवाई केली जात आहे, असेही बिहार पोलिसांनी ट्विटर हँडलवरुन माहिती देताना म्हटलं आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेवरुन आता विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. विरोधकांनी नितीश कुमार सरकारला प्रश्न विचारत एनडीए सरकारवर जोरदार टीका केली आहे. आरजेडी प्रवक्ता मृत्यूंजय तिवारी यांनी म्हटले की, हे कोणतं राज्य आहे, या महाजंगलराजमध्ये महाआरोपी राज कायम आहे. बिहारमध्ये शासन आणि प्रशासनाचा वचक राहिलेला नाही, असेही राजेडीच्या ट्विटर हँडलवरुन म्हटलं आहे.
तालिबानी सरकारची काढली आठवण..
मृत्यूंजय तिवारी यांनी तालिबानी सरकारची आठवण काढत, नितीशकुमार सरकारवर निशाणा साधला आहे. बिहारमध्ये चाललंय काय, डबल इंजिन सरकार हे गुंडाराज कधी संपवणार?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. बिहारमध्ये एनडीएचं डबल इंजिन सरकार आहे, त्यामुळे आरोपींचा जयजयकार होत आहे. राज्यातील अरेरिया येथे घडलेली ही घटना लाजीरवाणी असून अमानवीय असल्याचंही मृत्यूंजय यांनी म्हटले आहे.