मुंबई : ऑस्ट्रेलियाने नुकताच स्कॉटलंडविरुद्धच्या 3 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 3-0 ने विजय मिळवला आहे. ही सीरिज जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शला अशी ट्रॉफी देण्यात आली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग होत असल्याचे दिसून येत आहे. ही ट्रॉफी पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. काहींना ही ट्रॉफी आईसक्रीमच्या कपसारखी दिसतेय तर काहींनी या ट्रॉफीची छोटा कटोरा म्हणून खिल्ली उडवली असल्याचे दिसते आहे.
खुद्द ऑस्ट्रेलियन खेळाडूही ही ट्रॉफी पाहून हैराण झाले. ट्रॉफी पाहिल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही त्यांचं हसू रोखता आलं नाही, परंतु ही ट्रॉफी नेमकी काय आहे? हे त्यांना नंतर लक्षात आला आहे. या ट्रॉफीचं कनेक्शन व्हिस्कीसोबत असलयाचे समोर आले आहे.
अधिक माहिती अशी की, कटोऱ्यासारख्या दिसणाऱ्या या वस्तूला स्कॉटलंडमध्ये क्वॅच नावाने ओळखतात. हा छोटा कटोरा स्कॉटलंडमध्ये पारंपरिक पद्धतीने व्हिस्की किंवा अन्य पेय पिण्यासाठी वापरला जात असतो. स्कॉटलंडचं राष्ट्रीय पेय स्कॉच आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही टी-20 सीरिज जिंकल्यानंतर या ट्रॉफीमध्ये व्हिस्की टाकून सेलिब्रेशन केलं आहे.
कॅप्टन मार्शलही लोटपोट..
तिसऱ्या टी-20 मध्ये विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शलाही ट्रॉफी देण्यात आली आहे, यानंतर त्यालाही हसणं रोखता आलेल नाही. विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना जेव्हा ट्रॉफीसोबत फोटो काढायला सांगितलं गेलं तेव्हा त्यांनाही या ट्रॉफीसोबत फोटो कसा काढायचा? असा प्रश्न पडला होता.