रांची : लग्नाची वरात निघाल्यानंतर आई-बाप आपल्या मुलीला निरोप देऊन लेकीच्या सुखी जीवनाची स्वप्न पाहत असतात. पण सर्वच स्वप्न सत्यात उतरतात असं नाही. असंच काहीसं झालंय रांचीच्या कैलाश नगरात. या ठिकाणी प्रेम गुप्ता यांनी त्यांच्या मुलीला लग्नापूर्वी नेलं होतं तसंच तिला तिच्या सासरहून वाजत गाजत परत घरी आणलं.
त्याचं झालं असं, जावई सचिनने आपल्या मुलीची फसवणूक केल्याचा आरोप प्रेम गुप्ता यांनी केला आहे. त्यानुसार, सचिनचे आधीच लग्न झाले होते. त्याने एकदा नव्हे तर दोनदा लग्न केले होते. इकडे तिसर्या लग्नानंतरही तो साक्षीसोबत राहत नव्हता. म्हणून त्याने आपल्या मुलीला पूर्ण सन्मानाने परत आणले. त्याने त्याचा व्हिडिओ आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केला आणि लिहिले की, ‘जेव्हा तुमच्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात आणि दिखाऊपणाने केले जाते आणि जर तुमचा जोडीदार आणि कुटुंब चुकीचे काम करत असेल तर तुम्हाला तुमच्या मुलीला तुमच्या घरी परत घेऊन जावे लागेल. कारण मुली खूप मौल्यवान असतात’.
आधीच दोन लग्न झाल्याचं समजताच…
प्रेम गुप्ता यांनी अगदी थाटामाटात मुलीचं लग्न लावून दिलं होतं. लग्नाच्या काही दिवसानंतर सासरी मुलीचा छळ होऊ लागला. पती मुलीला बाहेर काढायचा. लग्नाच्या एक वर्षानंतर साक्षीला कळाले की, ज्याच्यासोबत तिचे लग्न झाले आहे त्याने याआधीच दोन लग्न केली आहेत. ही गोष्ट साक्षीला समजताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. परंतु, छळ आणि अत्याचाराला कंटाळून या नात्यात राहणे कठीण आहे हे कळल्यानंतर साक्षीने नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
घरी परत येताच बँडबाजा, फटाक्यांची आतिषबाजीने स्वागत
साक्षीच्या वडिलांनी आणि तिच्या घरच्यांनी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यानंतर सासरहून माहेरी आणताना बँडबाजा, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मुलीची छळातून सुटका झाल्याने वडिलांनी आनंद व्यक्त केला. साक्षीने नवऱ्यासोबत घटस्फोट देण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. नवऱ्याने पोटगी द्यावी, अशी तिची मागणी आहे.