दिल्ली : द्वारका येथील नजफगढ भागात चौथीत शिकणारा मुलगा चक्क पिस्तुल घेऊन शाळेत दाखल झाला. त्याने शाळेच्या बॅगेत पिस्तूल आणून वर्गातील मित्रांना दाखवत होता. या प्रकारामुळे शाळेत प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणाची माहिती शाळा प्रशासनाने पोलिसांनी दिल्यानंतर चौकशी सुरू झाली. दीपक विहार येथील ग्रीन व्हॅली स्कूलमध्ये ही घटना शनिवारी घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिस्तूल घेऊन येणारा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे. पिस्तूल घेऊन येत असल्याची माहिती शाळा प्रशासनापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी कसेबसे मुलाकडून पिस्तूल हिसकावून घेतले आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. मुलाच्या बॅगेत सापडलेल्या पिस्तुलात मॅगझीन नव्हते. पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी मुलाच्या आईने हे पिस्तूल बाहेर काढले होते.
याबाबत मुलाला विचारले असता त्याने ते खेळण्यातील पिस्तूल असल्याचे समजून बॅगेत ठेवल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी शस्त्र परवाना तपासला. दरम्यान, मुलाच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. घरात ठेवलेल्या पिस्तुलाकडे कोणी लक्ष दिले नाही. शनिवारी मुलाने आईपासून पिस्तूल लपवून शाळेच्या बॅगेत ठेवले आणि शाळेत नेले.
या प्रकरणी मुलाच्या आईने सांगितले की, पिस्तूल चुकून आपल्या मुलाच्या बॅगमध्ये गेले. याबाबत मुलाला विचारले असता त्याने ते खेळण्यातील पिस्तूल असल्याचे समजून बॅगेत ठेवल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडल्याचे आढळून आले नाही. यानंतर मुलाच्या आईने स्वतः पिस्तूल नजफगढ पोलिस स्टेशनच्या मलखानामध्ये जमा केले आहे.