उदयपूर : उदयपूरमधील घटनेनं सर्व देश हादरला आहे. दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर त्याच शाळेत शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यानं चाकूनं हल्ला केला होता. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, अखेर आज त्याचा एमबी रुग्णालयात मृत्यू झाला. विद्यार्थीच्या मृत्यूनंतर जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त रुग्णालयाबाहेर तैनात करण्यात आला आहे. तसेच रुग्णालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठा तणाव निर्माण झाला आहे. जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्ह्यातील अनेक भागात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. येथील मुखर्जी नगर चौकात रविवारी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी महाराणा भूपाल शासकीय रुग्णालयापर्यंत रॅली काढली. जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात भेटू देत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता.
उदयपूरचे पोलिस अधीक्षक योगेश गोयल म्हणाले, “बाजार खुले आहेत पण कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीमुळे रविवारीही मोबाईल इंटरनेट सेवा बंद राहिली. परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले. आरोपीच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
16 ऑगस्ट रोजी शुक्रवारी 10 वीच्या विद्यार्थ्याने आपल्या वर्गमित्रावर चाकूने वार केले होते. त्यानंतर जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीपासून जिल्ह्यातील अनेक भागात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.