Woman demands divorce : नवरा-बायकोच्या भांडणाला काही ठोस कारणाची गरज नाही. ते कधीही आणि कुठंही अगदी क्षुल्लक कारणावरून होऊ शकतं. भांडणाचं रुपांतर थेट घटस्फोटापर्यंतही जाऊ शकतं. तुर्कीमध्ये याचा नुकताच प्रत्यय आला आहे. नवरा अंघोळ करत नाही, तसेच आठवड्यातून एक ते दोन वेळाच दात घासतो. या कारणावरून एका महिलेने थेट पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
तुर्की येथील या महिलेची ही मागणी ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. पण ती तिच्या मागणीवर ठाम राहिली आहे. त्या महिलेने असाही दावा केला आहे की, आंघोळ करत नसल्यामुळे आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच दात घासत असल्यामुळे पतीच्या अंगाचा घामाचा वास येतो.
ऑडिटी सेंट्रल या वेबसाइटच्या वृत्तानुसार, महिलेने तुर्की मीडियाला सांगितले की, तिने मुख्यतः वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावाचे कारण देत तिच्या पतीविरुद्ध घटस्फोटाचा खटला दाखल केला आहे. महिलेच्या वकिलाने अंकारा येथील १९ व्या कौटुंबिक न्यायालयात सांगितले की, तिच्या पतीने किमान ५ दिवस सतत तेच कपडे घातले होते आणि कधीतरीच आंघोळ केली होती, ज्यामुळे त्याच्या शरीराला आणि कपड्यांमधून सतत घामाचा वास येत होता.
७ ते १० दिवसातून एकदाच आंघोळ
न्यायालयीन कागदपत्रे आणि साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीनुसार, असं दिसून आले की महिलेचा पती हा ७ ते १० दिवसातून एकदाच आंघोळ करायचा. एवढंच नाही तर तो आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच ब्रश करायचा. ज्यामुळे श्वासोच्छवासाची दुर्गंधी आणि शरीराचाही घाण वास येत होता. त्यामुळेच त्या महिलेचं जगणं कठीण झालं होतं.
कोर्टाने घटस्फोट मंजूर करत दिले भरपाईचे आदेश
महिलेच्या पतीविरुद्धच्या दाव्यांची पुष्टी करण्यासाठी काही साक्षीदारांनाही न्यायालयात बोलावलं होतं. यामध्ये महिलेच्या पतीचे काही ओळखीचे लोक आणि त्याच्यासोबत काम करणारे काही सहकारी देखील होते. या सर्वांनी महिलेच्या पतीच्या खराब वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयींची पुष्टी केली. त्यानंतर न्यायालयाने महिलेला तिच्या पतीपासून घटस्फोट मंजूर करत वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे पत्नीला नुकसान भरपाई म्हणून 16,500 डॉलर्स ( सुमारे 13 लाख रुपये) देण्याचा आदेशही दिला आहे.