कोलकाता : कोलकाता आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिला ट्रेनी डॉक्टरसोबत अत्यंत क्रूर, अमानवीय अत्याचार करण्यात आले आहेत. महिला डॉक्टरसोबत जे घडलं त्याने कोलकाता शहर हादरलं आहे. महिला डॉक्टरवर आधी बलात्कार करण्यात आला. त्यानंतर अत्यंत निदर्यतेने तिची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ही भयानक घटना घडली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. महिला डॉक्टर मेडीकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर एक अटक केली असून स्थानिक पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
शरीरावर जखमा..
मिळालेल्या माहितीनुसार, मृत ट्रेनी डॉक्टर सेकंड ईयरची विद्यार्थिनी होती. शुक्रवारी बेशुद्धवस्थेत सेमिनार हॉलमध्ये सापडली. तिला तात्काळ रुग्णालयात नेलं. पण तपासल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बंगाल पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे. शव विच्छेदनातून लैंगिक छळ आणि त्यानंतर हत्या केल्याचं समोर आलं आहे. पीडितेचे दोन्ही डोळे आणि तोंडातून सुद्धा रक्त येतं होतं तसेच चेहरा आणि नखांवर जखमा होत्या. पीडितेच्या गुप्तांगासह पोट, गळा, ओठ आणि उजव्या हातावर जखमा झालेल्या आहेत.
रुग्णालयाची भूमिका संशयास्पद..
रुग्णालय व्यवस्थापनाची भूमिका संशयास्पद आढळत आहे. मुलीने जीवन संपवून घेतल्याची आम्हाला माहिती देण्यात आली होती, असा मुलीच्या नातेवाईकांचा आरोप आहे. रुग्णालयाला हे प्रकरण दाबायच आहे, असा नातेवाईकांनी आरोप केला आहे. महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर आरजी कर मेडीकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गदारोळ केला असून चिडलेले डॉक्टर संपावर गेले आहेत.