Tata Group : मुंबई : आजपर्यंत टाटा ग्रुप तुमच्या ताटात मीठ-मसाल्यांपासून, चहा-कॉफीपर्यंत सर्व काही देत होता. आता तुम्हाला चायनीज फूडची चवदेखील देणार आहे. तृणधान्यापासून, कडधान्य या संपूर्ण श्रेणी टाटाच्या ‘फूड फॅमिली’चा भाग आहेत. आता टाटा मार्केट ‘मॅगी नूडल्स’लाही टक्कर देणार आहे.
टाटा समूह दोन फूड कंपन्यांच्या अधिग्रहणासाठी करार करण्याच्या जवळ आला आहे. यातील एक कंपनी कॅपिटल फूड्स आणि दुसरी ऑरगॅनिक इंडिया आहे. कॅपिटल फूड्स हे ‘चिंग्स चायनीज’ आणि ‘स्मिथ अँड जोन्स’ सारख्या ब्रँडचे मालक आहे. तर ऑरगॅनिक इंडिया ही कंपनी ग्रीन टी सारखी इतर उत्पादने विकते. फॅब इंडियाने यामध्ये गुंतवणूक केली आहे.
टाटा समूहाची कंपनी ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ आपल्या गुंतवणूकदारांकडून कॅपिटल फूड्समधील 75 टक्के हिस्सा खरेदी करत आहे. कॅपिटल फूड्सचे संस्थापक चेअरमन अजय गुप्ता त्यात त्यांचा 25 टक्के हिस्सा कायम ठेवतील. कंपनीचे मूल्यांकन 5100 कोटी रुपये आहे, त्यामुळे हा करार 3,825 कोटी रुपयांमध्ये होऊ शकतो. त्याचप्रमाणं टाटा समूह ऑरगॅनिक इंडियामधील बहुसंख्य हिस्सा खरेदी करणार आहे. या करारासाठी ऑरगॅनिक इंडियाचे मूल्य 1800 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. टाटा समूह पुढील आठवड्यात या दोन्ही करारांबाबत अधिकृत घोषणा करू शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणत्याही कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.