नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. केजरीवाल आता आम आदमी पक्षाचा (आप) प्रचार करू शकणार आहेत. ईडीने अंतरिम जामीन देण्यास विरोध केला होता.
हा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने सांगितले की, आम्हाला कोणतीही समान रेषा ओढायची नाही. त्यांना मार्चमध्ये अटक करण्यात आली आहे. केजरीवाल यांना आधी किंवा नंतरही अटक करता आली असती. आता 21 दिवसांनी काही फरक पडणार नाही. अरविंद केजरीवाल यांना 2 जूनला परत आत्मसमर्पण करावे लागणार आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेला ईडीने गुरुवारी कडाडून विरोध केल्याची माहिती आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 21 मार्च रोजी ईडीने अटक केल्यापासून केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत.
सुप्रीम कोर्टात दिल्ली एक्साईज पॉलिसी प्रकरणी त्याच्या अटकेला आणि रिमांडला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वी त्यांची याचिका फेटाळून लावली होती, त्यानंतर सध्याचे अपील सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले होते. 7 मे रोजी अपीलावरील सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्याचे संकेत दिले होते, जेणेकरून ते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करू शकतील.
अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर केव्हा येणार?
अरविंद केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर न्यायालयाचा आदेश आता ट्रायल कोर्टात पाठवला जाईल. त्यानंतर ट्रायल कोर्टाद्वारे केजरीवाल यांच्या सुटकेचा आदेश तिहार तुरुंग प्रशासनाकडे पाठवला जाईल. सुटकेचा आदेश प्राप्त झाल्यानंतर तिहार तुरुंग प्रशासनाकडून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर अरविंद केजरीवालांना बाहेर सोडलं जाईल. सर्वसाधारणपणे तिहार तुरुंगात दररोज येणारे सर्व सुटकेचे आदेश हे एक तासात निकाली काढले जातात. यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आजच तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे.