नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी संजय सिंगच्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) अनेक प्रश्न विचारले होते. सुप्रीम कोर्टाने ईडीला विचारले होते की, संजय सिंह 6 महिने तुरुंगात होते आणि त्यांच्याकडे एकही पैसा सापडला नाही. तरीही ईडीला संजय सिंग यांना कोठडीत ठेवायचे आहे. त्यांना कोठडीत ठेवण्याची गरज का आहे? असाही प्रश्न सर्वोच्च न्यायालायने केला.
संजय सिंह यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले की, त्यांच्या विरोधात कोणतेही स्टेटमेंट आलेले नाही. आरोपपत्रात त्यांचे नाव आरोपी म्हणून कधीच नव्हते. केवळ दोन वेळा एक कोटी रुपये घेतल्याचे सांगण्यात आले. सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ईडीने जामीन अर्जाला विरोध केला नाही. जामिनाच्या अटी कनिष्ठ न्यायालय ठरवेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन देण्यास नकार देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आप नेत्याने फेब्रुवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारी रोजी दिल्लीतून राज्यसभेवर पुन्हा निवडून आलेले सिंग यांचा जामीन अर्ज फेटाळला होता, परंतु खटला लवकर सुरू करण्याचे निर्देश ट्रायल कोर्टाला दिले होते.