लखनऊ: युपी पोलीसमध्ये 60244 कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी घेण्यात आलेली लेखी परीक्षा पूर्ण झाली आहे. मात्र, परीक्षेदरम्यान अशा अनेक घटना समोर आल्याने ही परीक्षा चर्चेचा विषय ठरली. काही ठिकाणी बनावट परीक्षार्थी परीक्षा देताना पकडले गेले आणि कॉपी पुरवणाऱ्या अनेक टोळ्यांचाही पर्दाफाश झाला. परीक्षेबाबतही पेपरफुटीचे आरोप झाले होते. सोशल मीडियावर सलग दोन दिवस उमेदवारांकडून याबाबत मोहीम सुरू आहे. तथापि, यूपी पोलीस भरती मंडळाने पेपर लीकची माहिती खोटी असल्याचे म्हटले आहे. तसेच उमेदवारांना दिशाभूल करणारी माहिती टाळण्याचा सल्ला दिला आहे. या परीक्षेत एक प्रकरण समोर आले, ज्याने सर्वांनाच धक्का बसला. शनिवारी यूपी पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेच्या प्रवेशपत्राचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये उमेदवाराच्या नावाच्या जागी सनी लिओन लिहिले होते आणि अभिनेत्रीचा फोटोही होता.
प्रवेशपत्राचे छायाचित्र व्हायरल झाले आणि देशभरात चर्चेचा विषय बनला. ज्या उमेदवाराचे हे प्रवेशपत्र आहे, त्याचे नाव धर्मेंद्र कुमार आहे. धर्मेंद्र यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांनी फॉर्म भरताना बरोबर नाव टाकले होते, पण नंतर सनी लिओनीचे नाव आणि फोटो कसा आला हे त्यांना माहीत नाही. परीक्षा केंद्रावर उमेदवाराने प्रवेशपत्र दाखवले, तेव्हा सगळेच चक्रावून गेले. गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी पोहोचले. या तरुणाला परीक्षा देता आली नाही आणि त्याला चौकीवर बसवून चौकशी करण्यात आली. आता यूपी पोलिस भर्ती बोर्डाने या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला असून तरुणांच्या ॲडमिट कार्डवर सनी लिओनीचे नाव आणि फोटो कसा दिसला, हे सांगितले आहे.
एक चूक महागात पडली
या संदर्भात उत्तर प्रदेश पोलीस भरती आणि पदोन्नती मंडळाने नोटीस जारी करून उमेदवारांना 17 ते 20 जानेवारी दरम्यान त्यांच्या अर्जांमध्ये सुधारणा करण्याची संधी दिली आहे. या कालावधीत उमेदवारांना त्यांचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र ज्यांनी हे ऐकले नाही आणि आयडी पासवर्ड दुसऱ्याशी शेअर केला, त्यांच्या प्रवेशपत्राच्या तपशीलात छेडछाड करण्यात आली. धर्मेंद्रच्या बाबतीतही असेच घडले, ज्याच्या प्रोफाइलमध्ये सुधारणा विंडो दरम्यान त्याचे नाव आणि फोटो बदलले गेले. सध्या या प्रकरणी भरती मंडळाने पोलीस अधीक्षक महोबा यांना आयपी पत्ता शोधून तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना केल्या आहेत.