नवी दिल्ली : राज ठाकरे हे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये गेले आहेत. या भेटीमध्ये राज्याच्या महायुतीमध्ये आता मनसेचा समावेश होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. या भेटीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळत असून, मनसेला एक किंवा दोन जागा मिळू शकतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. लवकरच मनसेचा महायुतीमध्ये समावेश झाल्याची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवसेना फुटून दोन गट पडले. मात्र, मुंबईत आणि राज्यभरात उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळत असल्याचे चित्र आहे. आता उद्धव ठाकरेंना आव्हान देण्यासाठी ठाकरे ब्रँड उपयोगी पडेल अशी अटकळ भाजपने बांधली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने मनसेसोबत चर्चा केली असून त्यांनाही लोकसभेच्या काही जागा देण्यात येणार आहेत. दक्षिण मुंबईची जागा राज ठाकरेंना सोडण्याचा निर्णय भाजपने घेतल्याची माहिती मिळत आहे. या ठिकाणाहून मनसेचे बाळा नांदगावकर किंवा अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी सकाळी राज ठाकरेंची दिल्लीत भेट घेतली आणि चर्चा केली. त्यानंतर दोघेही अमित शाह यांच्या निवासस्थानी निघाले. राज ठाकरे यांच्याकडून दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या तीन पैकी किमान दोन लोकसभा मतदारसंघांची मागणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे या तीनही जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत. त्यापैकी एक जागा मनसेचे नेते बाळा नांदगावकरांना देण्याची भाजपने तयारी दर्शवल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री शिंदेंची यासाठी संमती आहे. मात्र राजकीय गणित पाहिल्यास दक्षिण मुंबईची जागा सध्या भाजपकडे आहे, तर शिंदेसेना नाशिकची जागा सोडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राखीव मतदारसंघ असलेल्या शिर्डीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यावर एकमत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, भाजप-मनसे युतीवरुन स्वत: फडणवीसांनीही गेल्या काही दिवसांत सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्वत: राज ठाकरे असो की मनसेचे नेते भाजपवर टीका टाळत आहेत.राज ठाकरेंनीही यापुढे मनसेचा प्रवास सत्तेच्या दिशेनं असेल असे म्हटले होते. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. महायुतीत भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. आता मनसेचा समावेश झाल्यास महायुतीची ताकद आणखी वाढेल, अशी चर्चा होत आहे.