नवी दिल्ली: काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. वास्तविक, भारताच्या विविधतेबद्दल बोलताना सॅम पित्रोदा म्हणाले की, भारतात पूर्वेकडील लोक चिनीसारखे, तर दक्षिणेकडील लोक आफ्रिकनसारखे दिसतात. पश्चिमेकडील लोक अरबी आणि उत्तर भारतीय गोरे दिसतात. नुकतेच सॅम पित्रोदा यांनी वारसा करावर भाष्य केले होते, पित्रोदा यांच्या त्या विधानावरून बराच वाद झाला होता.
सॅम पित्रोदा यांनी ‘द स्टेट्समन’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भारताच्या विविधतेवर हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘आम्ही भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला एकत्र ठेवू शकतो, जेथे पूर्वेकडील लोक चिनीसारखे, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे, उत्तरेकडील लोक गोरे आणि दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात. काही फरक पडत नाही, आम्ही सर्व बहिण आणि भाऊ आहोत. पित्रोदा म्हणाले की, भारतातील विविध प्रदेशातील लोकांच्या चालीरीती, खाद्यपदार्थ, धर्म, भाषा भिन्न आहेत. परंतु, भारतातील लोक एकमेकांचा आदर करतात. काँग्रेस नेते म्हणाले की, देशातील जनता 75 वर्षांपासून आनंददायी वातावरणात राहिली आहे, काही भांडणे सोडली तर लोक एकत्र राहू शकतात.
भाजप नेत्यांनीही सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, ‘सॅम भाई, मी ईशान्येचा आहे आणि मी भारतीयासारखा दिसतो. आपण भिन्न दिसू शकतो, परंतु आपण सर्व एक आहोत. आपल्या देशाबद्दल थोडे समजून घ्या.