नवी दिल्ली: टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणात चारही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. साकेत कोर्टाने दोषींना दंडही ठोठावला आहे. या प्रकरणात रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार या दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चौघांवर मोक्का लावण्यात आला होता.
30 सप्टेंबर 2008 रोजी दुपारी साडेतीन वाजता सौम्या आपल्या कारमधून घरी परतत असताना तिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी या हत्येमागे दरोडा असल्याचा दावा केला होता. सौम्याच्या हत्येप्रकरणी रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी या पाच जणांना अटक करण्यात आली असून हे सर्व आरोपी मार्च 2009 पासून न्यायालयीन कोठडीत आहेत. दिल्ली पोलिसांनी या सर्व आरोपींवर मोक्का लावला होता.
आयटी प्रोफेशनल जिगीशा घोष यांच्या हत्येसाठी वापरलेले हत्यार जप्त झाल्याने विश्वनाथन खून प्रकरणाचे गूढ उकलल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मलिक यांनी 2019 मध्ये उच्च न्यायालयात जलद खटला चालवण्याची विनंती केली होती. यानंतर उच्च न्यायालयाने आरोपपत्र दाखल करून साडेनऊ वर्षे उलटूनही सुनावणी का पूर्ण झाली नाही, याचा अहवाल कनिष्ठ न्यायालयाकडून मागवला होता. ट्रायल कोर्टाने उच्च न्यायालयाला कळवले होते की, विलंबाचे प्राथमिक कारण म्हणजे फिर्यादी साक्षीदारांची अनुपस्थिती आणि विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्तीला लागणारा वेळ.