नवी दिल्ली: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बुधवारी जयपूरमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. सोनिया या गांधी कुटुंबातील दुसऱ्या सदस्या आहेत, ज्या राज्यसभेचा भाग होणार आहेत. त्यांच्या आधी इंदिरा गांधी राज्यसभेच्या सदस्य झाल्या होत्या. इंदिरा गांधी या 1964 ते 1967 दरम्यान राज्यसभेच्या खासदार होत्या. काँग्रेस परिवाराचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याऐवजी सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. 2004 पासून त्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यास महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत सोनिया गांधी यांचा राज्यसभेवर जाण्याचा निर्णय धक्कादायक आहे. मात्र, आता त्यांची मुलगी प्रियांका गांधी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रियांकाने अद्याप कोणतीही निवडणूक लढलेली नाही.
राजस्थानमध्ये राज्यसभेचा एक खासदार निवडून आणण्याची ताकद काँग्रेसकडे आहे आणि या एका जागेसाठी सोनिया अर्ज दाखल करणार आहेत. 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत राजस्थानमधून तीन खासदार निवडून येणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भूपेंद्र यादव आणि किरोरी लाल मीणा यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याच्या सोनियांच्या निर्णयावरून गांधी घराणे किंवा काँग्रेस पक्ष हिंदी भाषिक राज्यांमध्ये आपली पकड पुन्हा मजबूत करू इच्छित असल्याचे दिसून येते. दक्षिण भारतीय राज्यांमध्येही काँग्रेस पक्ष सत्तेत आहे, पण सोनियांनी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, 2019 मध्ये राहुल गांधींनी अमेठीसह वायनाडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. अमेठीतून त्यांचा पराभव देखील झाला.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. त्याचवेळी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली, तर छत्तीसगडमध्ये केवळ दोन जागा मिळाल्या. सोनिया गांधी यांच्या या निर्णयामुळे पक्षाला हिंदी पट्ट्यातील गमावलेली जागा पुन्हा मिळवायची आहे हेच दिसून येते.
1999 मध्ये सोनिया गांधी पहिल्यांदा अमेठीतून लोकसभेच्या खासदार झाल्या. यापूर्वी राजीव गांधी यांनी या जागेवर निवडणूक जिंकली होती. मात्र, 2004 मध्ये राहुल गांधींनी या जागेवरून निवडणूक लढवली आणि सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सोनियांनी यापूर्वी दक्षिण भारतातून लोकसभा निवडणूक लढवली आहे. गांधी घराण्यातील राहुल आणि सोनिया यांच्या आधी इंदिराजींनी दक्षिण भारतात निवडणूक लढवली होती. मात्र, दक्षिण भारतातील कोणत्याही राज्यातून गांधी कुटुंबातील एकही सदस्य राज्यसभेवर गेला नाही.