चेन्नई : पुण्यातील एका नामांकित कंपनीत काम करणा-या सीए तरुणीचा ‘कामाच्या ताणतणावामुळे (दि.20 जुलै) मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना अशातच चेन्नईमध्ये कामाच्या तणावाखाली येऊन एका सॉफ्टवेअर इंजिनीयरने स्वत:ला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाबलीपूरम रोड जवळ असलेल्या थाझंबूर येथील राहत्या घरात त्याने गुरुवारी आत्महत्या केली
कार्तिकेयन (वय-38) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकेयन यांनी स्वत:ला इलेक्ट्रिक शॉक देऊन संपवल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी कार्तिकेयन यांच्या पत्नी जयाराणी घरी आल्या तेव्हा ही सर्व घटना समोर आली. कार्तिकेयन पत्नी आणि 8 वर्षांच्या मुलासोबत चेन्नईमध्ये राहत होते. कार्तिकेयन मागील 15 वर्षांपासून एका सॉफ्टवेअर कंपनी टेक्निशियन म्हणून काम करत होते. कामाच्या दबावामुळे त्याने नैराश्याची तक्रार त्याने केली होती. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्यावर मेडावक्कम येथील रुग्णालयात उपचार सुरु होते.
कार्तिकेयन यांना एवढं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास सुरु आहे. कार्तिकेयन यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटदेखील सापडली आहे. यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.