नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने चार राज्यांमधील राज्यसभेच्या सहा जागांसाठी मंगळवारी पोटनिवडणुकीची घोषणा केली. या सहा जागांवर २० डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. यामध्ये आंध्र प्रदेशातील तीन, तर ओडिशा, पश्चिम बंगाल आणि हरियाणातील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.
वायएसआर काँग्रेसचे सदस्य वेंकटरमण राव मोपीदेवी, बीडा मस्तान राव यागव आणि रयागा कृष्णय्या यांनी ऑगस्ट महिन्यात आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश आणि ओडिशात विधानसभा निवडणुका झाल्या आणि या राज्यांमध्ये सत्तांतर झाले. त्यामुळे राज्यसभा पोटनिवडणुकीत आंध्र प्रदेशात सत्ताधारी तेलगू देसम पक्ष, तर ओडिशात भाजपचे पारडे जड राहील. पश्चिम बंगालची जागा पुन्हा तृणमूल काँग्रेस, तर हरियाणाची जागा पुन्हा भाजपच जिंकेल.