बंगळुरू: कर्नाटकातील हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांना शुक्रवारी (३१ मे) पहाटे बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी अटक केली. जेडीएसचे निलंबित खासदार प्रज्वल यांच्यावर शेकडो महिलांचे लैंगिक शोषण आणि त्याचे व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. हसनमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रेवण्णाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर तो पोलिसांना चकवा देत जर्मनीला पळून गेला होता.
कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) प्रज्वल रेवन्ना भारतात आल्याची माहिती इंटरपोलकडून मिळाली होती. यानंतर एसआयटी, बेंगळुरू पोलिस आणि इमिग्रेशन अधिकारी शुक्रवारी पहाटे विमानतळावर पोहोचले. रेवन्ना विमानातून उतरताच त्याला अटक केली. एसआयटीने प्रज्वल रेवन्नाला ताब्यात घेतले असून आता व्हायरल व्हिडिओ संदर्भात त्याची चौकशी केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रज्वल रेवन्नाने एक व्हिडिओ जारी करून भारतात परतणार असल्याची माहिती दिली होती.
त्याच वेळी, लैंगिक शोषणाच्या आरोपांचा सामना करणाऱ्या प्रज्वल रेवन्ना याच्यासोबत एसआयटी बेंगळुरू येथील सीआयडी कार्यालयात पोहोचली आहे. आता त्याची चौकशी करण्यात येणार असून या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतरांची नावे शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जामिनासाठी अर्ज दाखल
हसनमधून निवडणूक लढवत असलेल्या प्रज्वल रेवन्ना याने या आठवड्यात एक व्हिडिओ संदेशही जारी केला होता. त्यात म्हटले होते की, शुक्रवारी म्हणजेच 31 मे रोजी सकाळी 10 वाजता स्वत:ला एसआयटीकडे सोपवणार आहे. बुधवारी प्रज्वलने स्थानिक न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. आता न्यायालय त्याला दिलासा देते की नाही, हे पाहणे महत्वाचे आहे.