दिल्ली : सिंघम आयपीएस अधिकारी म्हणून ओळख असलेले आणि महाराष्ट्रातील रहिवाशी असलेले शिवदीप लांडे यांचा राजीनामा केंद्र सरकारने अखेर मंजूर केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लांडे यांचा राजीनामा मंजूर केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. 13 जानेवारी 2025 पासून तत्काळ प्रभावाने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी म्हणून त्यांची सेवा आता समाप्त झाली आहे. शिवदीप पांडे हे अकोला जिल्ह्यातील रहिवाशी आहे. ते बिहारमधील पूर्णिया विभागात आयजी म्हणून कार्यरत होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना पटण्यात बोलवण्यात आले होते.
गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जाहीर..
शिवदीप लांडे यांची ओळख बिहारमधील सिंघम अशी झाली होती. त्यांच्या ज्या ठिकाणी पोस्टींग झाली त्या ठिकाणी ते नेहमीच बातम्यांचे विषय बनले. आपल्या कामगिरीचा त्यांनी चांगलाच ठसा उमटवला. तसेच त्यांनी गुन्हेगारांना जबरदस्त धडा शिकवला. त्यामुळे अनेक युवक त्यांना आपला आदर्श मानून आयपीएसच्या तयारीला लागले.
नेमकं प्रकरण काय?
शिवदीप लांडे यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी राजीनामा दिला होता. अनेक महिने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता. त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती फेसबूकवरुन शेअर केली होती. शिवदीप लांडे यांचा राजीनामा बिहार सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यानंतर आता त्यांचा राजीनामा मंजूर केल्याची अधिसूचना गृहमंत्रालयाने काढली आहे. शिवदीप लांडे हे केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले होते. त्यानंतर त्यांना बिहारमध्ये परत बोलवण्यात आले. बिहारमध्ये आल्यानंतर त्यांना आयजी म्हणून पदोन्नती देण्यात आली होती.
शिवदीप लांडे यांचं पुढचं नियोजन काय?
शिवदीप लांडे यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर आता ते पुढे काय करणार? यासंदर्भात चर्चा रंगू लागली आहे. ते राजकारणात येणार असल्याचे अनेक दिवसांपासून बोलले जात आहे. परंतु ते महाराष्ट्रात परत येणार नाही, बिहार हिच कर्मभूमी म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील अकोल जिल्ह्यातील असलेले शिवदीप लांडे बिहारमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. ते मुझफ्फरपूरमध्ये जितके लोकप्रिय आहेत तितकेच पटनामध्येही आहे.