नवी दिल्ली : भारताचा अंतराळ क्षेत्रातील मोठा टप्पा गाठणारा क्षण मंगळवारी आला, जेव्हा भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) यशस्वीपणे पृथ्वीवर परतले. शुक्ला हे आयएसएसवर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरले आहेत. याआधी ४१ वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी अंतराळात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

शुक्ला यांनी अवकाशात असताना केलेल्या ७ महत्त्वपूर्ण चाचण्या ‘गगनयान’ मोहिमेसाठी मोलाच्या ठरणार आहेत. ही मोहीम भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम असणार असून, त्याद्वारे भारतीय अंतराळवीराला स्वदेशी अंतराळ यानातून अवकाशात पाठवले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले
शुभांशूच्या कामगिरीचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारा भारताचा पहिला अंतराळवीर म्हणून शुभांशूने आपल्या समर्पण, धैर्य आणि अग्रगण्यतेच्या बळावर अब्जावधी स्वप्नांना प्रेरणा दिली आहे.”
ते पुढे म्हणाले, “गगनयान मोहिमेच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा असून, भारताच्या अंतराळ वाटचालीत याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.”
शुक्लाच्या अनुभवाचा गगनयानला उपयोग : इस्रो
इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटरचे संचालक नीलेश एम. देसाई यांनी सांगितले की, “शुक्ला यांनी आयएसएस वर काम करताना जो अनुभव घेतला, तो गगनयान मोहिमेसाठी अतिशय उपयोगी ठरेल.”
ते पुढे म्हणाले, “शुक्ला यांनी अंतराळात विविध जैववैज्ञानिक, तांत्रिक आणि आरोग्यविषयक प्रयोग केले आहेत. गगनयान मोहिमेसाठी आम्ही या वर्षी एक मानवरहित मोहीम पाठवणार आहोत. त्यानंतर आणखी दोन मानवरहित मोहिमा पार पडतील आणि नंतर भारतीय अंतराळवीराला प्रत्यक्ष अवकाशात पाठवले जाईल.”
गगनयान मोहिमेचा आराखडा :
१) पहिलं मानवरहित उड्डाण: 2025 अखेरीस
२) एकूण मानवरहित मोहिमा: 3
३) मानवी अंतराळ मोहीम: एका भारतीय अंतराळवीरासह
या मोहिमांचा कालावधी 2 ते 7 दिवसांचा असणार आहे.
भारतीय तंत्रज्ञानावर आधारित अंतराळ उड्डाण यशस्वी करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
शुभांशू शुक्ला यांचे अंतराळातून सुखरूप पुनरागमन आणि त्यांनी केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष गगनयान मोहिमेच्या यशात निर्णायक भूमिका बजावणार आहेत. यामुळे भारताची अंतराळ संशोधनातली स्वायत्तता आणि आत्मनिर्भरता आणखी बळकट होणार आहे. भारताचे अंतराळ स्वप्न आता आणखी जवळ आले आहे.







