Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक रॅलीत गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत डोनाल्ड ट्रम्प जखमी झाले आहेत. पेनसिल्व्हेनियातील बटलर शहरात शनिवारी (13 जुलै) स्थानिक वेळेनुसार एका निवडणूक रॅलीला संबोधित करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी गोळीबाराची घटना घडली आहे. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, त्याच्या चेहऱ्यावर रक्त दिसत होते. सुरक्षारक्षकांनी त्यांना तातडीने मंचावरून सुखरूप खाली घेतले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक रॅलीत झालेल्या गोळीबारानंतर एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्या कानाजवळून रक्त येत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान सीक्रेट सर्व्हिसचे कर्मचारी त्यांना स्टेजवरून सुखरूप खाली उतरवत आहेत.
नेमकं काय घडलं?
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत जसा गोळीबाराचा आवाज आला तसा ट्रम्प यांनी हाताने उजवा कान धरला. दरम्यान, हे पाहण्यासाठी त्यांनी हात खाली आणला आणि नंतर व्यासपीठाच्या मागील बाजूला ते गुढघ्यावर बसले. यावेळी क्षणाचाही विलंब न करता सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी लगेच त्यांना घेरलं. लगेच काही मिनिटानंतर ते बाहेर पडले, त्यांची लाल “मेक अमेरिका ग्रेट अगेन” टोपी काढली आणि ते “थांबा, थांबा” असे म्हणत होते. यानंतर सीक्रेट सर्व्हिस एजंट त्यांना कारमध्ये घेऊन निघून गेले.
या घटनेनंतर ट्रम्प यांच्या उजव्या कानावर आणि चेहऱ्यावर रक्ताचे डाग दिसून आले. दरम्यान ट्रम्प यांच्या कानाजवळ रक्त कसं आलं आणि ते कसे जखमी झाले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्या उजव्या कानाला आणि चेहऱ्याच्या उजव्या बाजूला रक्त दिसून येत आहे.