नवी दिल्ली : चेक प्रजासत्ताक या युरोपीयन देशात मोठी दुर्घटना घडली आहे. चार्ल्स विद्यापीठामध्ये गुरुवारी रात्री बेछूट गोळीबार झाला. झालेल्या या गोळीबारामध्ये 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 30 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 13 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. काही फुटेजमध्ये विद्यार्थी गोळीबारातून इकडे-तिकडे पळताना दिसत आहेत. हल्लेखोर नेमका कोण होता, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. चेक प्रजासत्ताकमधील प्राग राजधानीत चार्ल्स विद्यापीठात ही घटना घडली. एका बंदूकधारी हल्लेखोरानं अंदाधुंद गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी हल्लेखोराला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. पंरतु त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला. मात्र रुग्णालयात नेतानाच त्याचा मृत्यू झाला.
गोळीबाराच्या घटनेदरम्यान काही विद्यार्थांनी स्वत:ला वर्गात कोंडून घेतलं. तर काही विद्यार्थी इमारतीच्या गॅलरीमध्ये लपले. यात खाली पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. चार्ल्स विद्यापीठाच्या फिलॉसॉफी कॅम्पसमध्ये ही घटना घडली. गुरुवार कॉलेजचा शेवटचा दिवस होता आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना नाताळच्या सुट्ट्या सुरू होणार होत्या.