लखनौ : उत्तर प्रदेशमधून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. लखनौमधील ट्रान्सपोर्ट नगरमधील हरमिलाप टॉवरचा एक भाग काल सायंकाळी पाच वाजता कोसळला आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 28 जण जखमी झाले आहेत. या इमारतीमध्ये औषध आणि तेल कंपन्यांची चार गोदामं असल्याची माहिती मिळत आहे. त्यामध्ये 30 कर्मचारी काम करायचे.
मिळालेल्या वृत्तानुसार, लखनौमधील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये हरमिलाप टॉवर येथील तीन मजली इमारत कोसळली असून ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी तिथं ट्रकमधून माल उतरवला जात होता. या टॉवरमध्ये औषधं, गिफ्ट, पॅकिंग, मोबिल ऑईल याची गोदामं होती. तिथून ते साहित्य इतर ठिकाणी पाठवलं जात होते.
या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असणारा ट्रक चालक राजेश पाल म्हणाला की, सायंकाळी 4.55 वाजता तो या इमारतीमध्ये पोहोचला होता. त्यानं ट्रकमधून साहित्य उतरवण्यासाठी तो इमारतीत लावला होता. दिल्लीहून आणलेली औषधं उतरवुन घेण्याचं काम सुरु होतं, ते दुसऱ्या मजल्यावर नेलं जात होतं. हे काम जवळपास 15 ते 20 लोक करत होते तेवढ्यात इमारत कोसळली. कुणालाच काही समजलं नाही, साहित्य उतरवण्याचं काम करणाऱ्या लोकांनी पळत जाऊन जीव वाचवला. काही लोकांना स्थानिकांच्या मदतीनं आणि पोलिसांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आल्याची माहिती राजेश पालनं दिली आहे.
स्थानिक प्रशासनानं या घटनेची माहिती मिळताच बचावकार्यास सुरवात केली. यामध्ये स्थानिक पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ, लखनौ महानगर पालिकेची टीम सहभागी झाली होती. स्थानिक अधिकारी अमिताभ यश यांनी संपूर्ण इमारतीत शोध मोहीम सुरु असल्याची माहिती दिली. लखनौमधील या इमारत दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सुद्धा दु:ख व्यक्त केलं.