दिल्ली : दिल्लीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. कारचालकाला कॉन्स्टेबलने थांबवण्याचा प्रयत्न केला. पण कार चालकाने कार न थांबवता थेट अंगावरच गाडी घातली. त्यानंतर कॉन्स्टेबलला १० मीटर पर्यंत फरफटत नेले आणि चिरडून मारण्यात आले. घटनेनंतर आरोपी हा गाडी तिथेच सोडून घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.
अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री उशिरा नांगलोई पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. कारमधील व्यक्तीसोबत पोलिसांचा वाद झाला होता. या वादात कारचालकाने कॉन्स्टेबलच्या अंगावर थेट कार घातली. कारने फरफटत नेत चिरडण्यात आले. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू झाला. संदीप असं मृत पोलीस कॉन्स्टेबलचं नाव असून ते २०१८ पासून पोलीस सेवेत कार्यरत होते. नांगलोई पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती होती. त्यांच्या मागे आई, बायको आणि ५ वर्षांचा मुलगा आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, नांगलोई परिसरात वादानंतर कारचालकाकडून कॉन्स्टेबलला चिरडून मारण्यात आले. कॉन्स्टेबलने कारचालकाला कार बाजूला घेण्यास सांगितले होते. यामुळे संतापलेल्या कारचालकाने कॉन्स्टेबलच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडले. पोलिसांनी कार जप्त केली आहे. तर आरोपी फरार आहे.