नोएडा : नोएडातील बसई गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन तरूणांचा घरात गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना नोएडाच्या सेक्टर ७० मधील बसई गावात घडली असून, छोले भटूरे स्टॉलसाठी रात्री चणे प्रेशर कुकरमध्ये शिजत ठेवले होते. दोघांना अचानक झोप लागली आणि घर धुरानं भरलं होतं, यामध्ये काही वेळानंतर गुदमरून दोघांचा मृत्यू झाला. काही तासानंतर शेजाऱ्यांना दोघेही मृतावस्थेत आढळून आले. दोघांचा असा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
यासंदर्भात नोएडा सेंट्रल झोनचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजीव गुप्ता म्हणाले, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. २२ वर्षांचा उपेंद्र आणि २३ वर्षांचा शिवम अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. रात्री स्टोव्हवर प्रेशर कुकरमध्ये चणे शिजत ठेवल्यानंतर दोघांनाही झोप लागली. इतक्या गाढ झोपेत आपण प्रेशर कुकरमध्ये चणे शिजत ठेवले होते, याची सुद्धा कल्पना त्यांना नव्हती.
स्टोव्हवर चणे प्रेशर कुकरमध्ये शिजत असल्यामुळे घर धूरानं गच्च भरलं होतं. घराचा दरवाजा बंद असल्यामुळे खोलीत ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. जळणाऱ्या अन्नाच्या धुरासोबत खोलीत कार्बन मोनोऑक्साईडचे प्रमाण वाढले होते. विषारी धुरामुळे गुदमरून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. काही तासानंतर खोलीतून धूर येत असल्याचं शेजारच्यां निदर्शनास आले.
शेजाऱ्यांनी तातडीने घराचा कुलूप तोडून घरात प्रवेश केला. दोघांना बेशुद्ध अवस्थेत पाहून शेजाऱ्यांना धक्काच बसला. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा किंवा खुणा नव्हत्या. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.