उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरोहा जिल्ह्यात एका नर्सरीच्या विद्यार्थ्याने मांसाहारी पदार्थ शाळेत आणल्याबद्दल एका मुलाला शाळेतून काढून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासंबधीचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या शाळेत विद्यार्थ्याने डब्यात मांसाहारी पदार्थ आणल्याचे पाहून शाळेचे मुख्याध्यापकांनी राग व्यक्त केला सोबतच त्याला शाळेतून देखील काढलं असल्याची घटना घडली आहे.
नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका खासगी शाळेच्या विद्यार्थ्याने जेवणाच्या डब्यामध्ये नॉनव्हेज आणल्याचा आरोप शाळेच्या मुख्याध्यापकाने केला आहे. त्यानंतर मुख्याध्यापकाने त्या विद्यार्थ्याला शाळेतून बाहेर काढलं. यानंतर मुलाची आई आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्यामध्येल या गोष्टीवरून वाद झाल्याची माहिती मिळत आहे. या वादाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक मुलाच्या आईशी वाद घालताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये शाळेचे मुख्याध्यापक मुलाच्या आईला म्हणताना दिसतात, ‘आम्ही मंदिर तोडणाऱ्या मुलाला शिक्षण देऊ शकत नाही. या मुलामुळे इतर मुलांना देखील त्रास होत असल्याचं शाळेच्या मुख्याध्यापकांनी म्हटलं आहे. अशा मुलांना आपण शिक्षण देऊ नये जे आपली मंदिरे नष्ट करतील. जेवणासाठी मांसाहार आणतील असंही ते पुढे म्हणताना दिसत आहे.
मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी..
मुख्याध्यापकांनी दावा केला की, तुमचा मुलगा प्रत्येकाला नॉनव्हेज देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्याविषयी बोलतो, पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी शाळेत मुलासोबत भेदभाव केल्याचा आरोप केला असून मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. हा वाद सुरू आहे, तो विद्यार्थी नर्सरी वर्गाचा विद्यार्थी आहे.
तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन..
या विद्यार्थ्यांच्या आईने शाळेतील इतर मुलावर तिच्या मुलाला मारहाण करण्याचा आणि वारंवार त्रास दिल्याचा आरोप केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. यावर शाळेच्या मुख्याध्यापकांनी उत्तर देताना म्हटलं की, तुम्ही आता दुसऱ्या विद्यार्थ्यावर आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहात. पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून अमरोहा पोलिसांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे.