लुधियाना: पंजाबमधील लुधियाना येथे निहंगांनी (सशस्त्र शीख योद्धे किंवा अकाली) शिवसेना टकसाली नेत्यावर खुनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात शिवसेना नेते गंभीर जखमी झाले आहेत. निहंगांनी भर रस्त्यावर शिवसेना टकसाली नेत्यावर तलवारीने अनेक वेळा हल्ला केला. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना टकसाली नेते संदीप थापर हे शुक्रवारी सकाळी संवाद ट्रस्टच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. ते हॉस्पिटलच्या बाहेर उभे असताना अचानक स्कूटरवरून आलेले निहंग तेथे पोहोचले आणि त्यांच्यापैकी एकाने संदीप यांच्यावर धारदार तलवारीने हल्ला करण्यास सुरुवात केली. यामध्ये संदीप हे गंभीर जखमी होऊन रोडवरच खाली पडले. यानंतर निहंग स्कूटरवरून पळून गेले.
घटना घडली त्यावेळी शेजारी अनेक लोक उभे होते. मात्र, आरोपीच्या जवळ जाण्याचे धाडस कोणीच दाखवू शकले नाही. निहंग तेथून पळून गेल्यावर संदीप थापर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. संदीप थापर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना डीएमसी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. हल्ल्याच्या वेळी संदीप थापर यांच्यासोबत एक बंदूकधारी सुरक्षारक्षकही उपस्थित होता, मात्र निहंगांनी त्याला आधीच पकडल्याचे या सुरक्षारक्षकाने सांगितले. थापर यांना यापूर्वीही अनेकदा जीवघेण्या हल्ल्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले.
CCTV footage of attack on Shiv Sena Taksali leader Sandeep Thapar, alias Gora Thapar by four unidentified men in nihang attire in #Ludhiana. pic.twitter.com/UBsGNlK1h1
— Parteek Singh Mahal (@parteekmahal) July 5, 2024
या संपूर्ण प्रकरणाविषयी डीसीपी जसकिरनजीत सिंह तेजा यांनी सांगितले की, निहंगांनी शिवसेना टकसाली नेत्यावर हल्ला केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस सध्या आरोपींच्या शोधात व्यस्त आहेत. संदीप थापर यांच्या सुरक्षारक्षकाविषयीच्या प्रश्नावर डीसीपी म्हणाले की, हल्ल्याच्या वेळी सुरक्षारक्षक काय करत होते, याचाही तपास केला जाईल.
थापर खलिस्तानविरोधात बोलतात
शिवसेना टकसालीचे ज्वलंत नेते संदीप थापर आपल्या भाषणात खलिस्तानविरोधात जोरदार बोलतात. या कारणावरून त्यांना सतत धमक्या येत आहेत. याआधीही जेव्हा त्यांना सतत धमक्या येत होत्या, तेव्हा त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षेसाठी एक बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आला होता.