पंजाब: चंदीगडमध्ये लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या साथीदाराकडून झालेल्या कथित क्रूर हल्ल्यानंतर तब्बल ५४ दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा अखेर मृत्यू झाला. शनिवारी, २९ ऑगस्ट रोजी चंदीगडमधील रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. पोलिसांच्या माहितीनुसार, मनजीत कौर सात आठवड्यांची गर्भवती होती. तिला सात वर्षांचा मुलगाही असून तो तिच्या पहिल्या पतीसोबत राहत असल्याची माहिती आहे.

मनजीतचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती एका पुरुषासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. याच व्यक्तीसह त्याच्या एका साथीदारावर मनजीतच्या अपहरणाचा आणि तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे.

ही घटना ३ जुलै रोजी घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी मनजीतला दारूच्या दुकानाजवळ बोलावले. त्यानंतर तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवून मोरिंडा येथे नेण्यात आले. तेथील निर्जन ठिकाणी तिला एका झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला पेटवून दिल्याचा आरोप आहे. हा प्रकार तिच्या एका मैत्रिणीने पाहिला. तिने तत्काळ मनजीतला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

मनजीत गंभीररीत्या भाजल्याने सुरुवातीला तिच्यावर मोरिंडा येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला मॅक्स रुग्णालयात आणि पुढे पीजीआयमध्ये हलवण्यात आले. जवळपास दोन महिन्यांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर तिचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात जाऊन मनजीतच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. शुभी आणि पिंडा अशी आरोपींची नावे असून, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.
मनजीत कौर सोशल मीडियावर सक्रिय होती. ती मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होती आणि इंस्टाग्राम तसेच यूट्यूबवर मेकअप, संगीत आणि इतर विषयांवरील व्हिडीओ शेअर करत होती. इंस्टाग्रामवर तिचे सुमारे १.४६ लाख फॉलोअर्स होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, मनजीत मूळची हरियाणाची रहिवासी होती. मात्र, ती सध्या खरड येथे भाड्याच्या घरात राहत होती. काही ओळखीच्या व्यक्तींशी तिचा वाद सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि घटनेचे इतर पैलू याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.






