नवी दिल्ली : हरियाणातील अंबाला येथे भरधाव ट्रक आणि वैष्णो देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला. तर 20 हून अधिकजण जखमी झाले आहे. जखमी झालेल्यांना अंबालाच्या सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
बस दिल्ली-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर येताच तिची समोरुन जाणा-या ट्रकला धडक बसली. हा अपघात आज म्हणजेच 24 मे रोजी सकाळी घडला आहे. या अपघातात मिनी बसचं मोठं नुकसान झालं आहे.
Haryana | Seven people died and more than 20 people were injured in a bus accident on the Ambala-Delhi-Jammu National Highway: Dr. Kaushal Kumar, Civil Hospital, Ambala Cantt https://t.co/Iu332pIKq4 pic.twitter.com/6JcaJ4gxSv
— ANI (@ANI) May 24, 2024
हरियाणातील अंबाला-दिल्ली- जम्मू राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मिनी बस आणि ट्रकमध्ये भीषण टक्कर झाली आहे. घटनास्थळावरील दृश्य भयानक आहेत. अपघातादरम्यान घटनास्थळी आरडाओरडा झाला, जो ऐकूण स्थानिक नागरिक मिनी बसमध्ये उपस्थित लोकांना वाचवण्यासाठी धावत आले. लोकांच्या ओरडण्याचे आवाज येत होते. त्याचवेळी स्थानिक लोकांनी कसेबसे जखमींना बसमधून बाहेर काढले आणि पोलीसांना फोन करुन अपघाताची माहिती दिली आहे.
यावेळी पोलीसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर कुटुंबियांच्या ताब्यात दिले जातील. ही मिनी बस हरियाणातील अंबालामार्गे माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होती. या बसमध्ये साधारण 27 भाविक होते.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. एफआयआर दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.