मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 11) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीला ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-आयुष्मान भारत’चा लाभ मिळणार आहे. गरीब-श्रीमंत असा भेद केला जाणार नाही, तर प्रत्येकाला त्याच्या कक्षेत आणले जाईल. असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ते म्हणाले की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ही एक नवीन श्रेणी असेल. या अंतर्गत सरकार 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधेसह आरोग्य विमा देणार आहे, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. यामुळे वृद्ध व्यक्तीला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-आयुष्मान भारत’चा लाभ मिळणार आहे.
70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज असणार आहे. एकूण 12.3 कोटी कुटुंबांना याचा लाभ होणार असून जी कुटुंबे आधीच आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती 70 वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास, त्यांना वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त टॉप-अप मिळेल. हे शेयर्ड आरोग्य कवच असेल, असंही मंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितले आहे.