अयोध्या : अयोध्येतील रामलल्लाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एसएसएफ जवानाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आह. संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने घटनास्थळी मोठी खळबळ उडाली आहे. शत्रुघ्न विश्वकर्मा असं गोळी लागून मृत्यू झालेल्या या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे.
मंदिरासमोर उभारण्यात येत असलेल्या व्हीआयपी गेटजवळ हा सुरक्षा रक्षक तैनात होता. मात्र, बुधवारी पहाटे सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात अचानक गोळी लागली. त्यामध्ये सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे.
अयोध्येच्या रामजन्मभूमीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाचा संशयास्पद परिस्थितीत गोळी लागल्याने मृत्यू झाला. घटनास्थळी तैनात असलेल्या सहकारी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शिपायाला तातडीने रुग्णालयात दाखल केले, तेथून त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले. ट्रॉमा सेंटरमध्ये डॉक्टरांनी जवानाला मृत घोषित केले.
विश्वकर्मा हा उत्तर प्रदेश येथील आंबेडकर नगरमधील रहिवासी होता. या सुरक्षा रक्षकाला गोळी कशी लागली? नेमकं काय घडलं? यासंदर्भातील तपास पोलिसांकडून करण्यात येणार आहे. राम मंदिराच्या सुरक्षेसाठी एसएसएफचे जवान तैनात करण्यात येतात. त्यामध्ये हा सुरक्षा रक्षक सामील होता.
दरम्यान, या घटनेनंतर पोलीस अलर्ट झाले असून पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहे. याच बरोबर या सुरक्षा रक्षकाच्या बरोबर ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचीही चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.