सिडनी : शास्त्रज्ञांनी प्रशांत महासागरात जगातील सर्वात मोठ्या ज्ञात प्रवाळाचा शोध लावला आहे. ३४ मीटर रुंद, ५.५ मीटर उंच आणि ३२ मीटर लांब असलेले हे प्रवाळ सॉलोमन बेटांच्या थ्री सिस्टर्स बेट समूहात सापडले. नॅशनल जिओग्राफिकच्या प्रिस्टाइन सीज चमूतील सागरी शास्त्रज्ञांनी त्याचा शोध लावला, असे शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
हे एकेकी प्रवाळ जवळ जवळ एक अब्ज लहान जीवजंतूंच्या (पॉलीप्स) जाळ्याने बनलेले असून, ३०० ते ५०० वर्षे जुने आहे, असे नॅशनल जिओग्राफिकचे निवासी संशोधक एनरिक साला यांनी सांगितले. हे प्रवाळ निरोगी आहे. मात्र, ते सुदूर असले तरी जागतिक तापमानवाढ आणि अन्य मानवी धोक्यांपासून सुरक्षित नाही, असेही ते म्हणाले. हे एक महत्त्वपूर्ण संशोधन आहे.
प्रारंभी प्रवाळ दिसल्यानंतर ते जलसमाधी मिळालेल्या एखाद्या जहाजाचा सांगाडा असेल असे संशोधकांना वाटले. समुद्राच्या पाण्याखाली छायाचित्रण करणारे छायाचित्रकार मनू सॅन फेलिक्स यांनी ही सागरी रचना जवळून पाहण्यासाठी १२ मीटरहून अधिक खोल बुडी मारली. तेव्हा त्यांना हा जहाजाचा सांगाडा नाही, तर प्रवाळ असल्याचे आढळले. हे पावोना क्लॅव्हस प्रजातीचे एकाकी कोरल आहे. प्रवाळ अनेक जीवजंतूंना अधिवास, अन्न, निवास आणि प्रजनन स्थळ उपलब्ध करून देते. हा शोध भावी पिढ्यांसाठी प्रवाळ भित्तीचे संरक्षण आणि जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित करतो, असे सोलोमन बेटांचे पंतप्रधान जेरेमिया मानेले यांनी सांगितले.