कोलकाता: तृणमूल काँग्रेसने (TMC) शाहजहान शेख (Shahjahan Sheikh) यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. तृणमूल नेते डेरेक ओब्रायन यांनी कोलकाता येथे ही माहिती दिली. यापूर्वी पश्चिम बंगालमधील संदेशखाली हिंसाचारातील मुख्य आरोपी शाहजहान शेख याला गुरुवारी अटक करण्यात आली होती. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला केल्यानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) नेता शेख फरार झाला होता. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीला बशीरहाट न्यायालयात हजर केले असता त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
उच्च न्यायालयाने दिले निर्देश :
उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल पोलिसांव्यतिरिक्त संदेशखाली येथील महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावल्याप्रकरणी मुख्य आरोपी शाहजहान शेख यालाही केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अटक केली जाऊ शकते, असे निर्देश दिले होते. राज्याच्या ॲडव्होकेट जनरलच्या अर्जावर न्यायालयाने २६ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशाचे स्पष्टीकरण दिले, ज्यात पोलिसांना शेखला अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते.
शेख मिनाखा येथील घरात लपला होता:
पोलिसांनी सांगितले की, शाहजहान शेख उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मिनाखा येथील एका घरात लपला होता, जिथून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करून 14 दिवसांची कोठडी मागितली. मात्र न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ईडीवर हल्ला करण्यासाठी जमावाला चिथावणी दिल्याची कबुलीही शेखने पोलिसांना दिल्याचा दावा अनेक वृत्तांत केला जात आहे.