समस्तीपूर: बिहारमधील समस्तीपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कचरा गोळा करणाऱ्या सहा महिला पोलिस ठाण्यात घुसल्या आणि तिथल्या टेबलावर ठेवलेल्या दारूच्या बाटल्या उचलून पळ काढला. मात्र एका पोलिसाने त्यांना हे करताना पाहिले. महिलांनी लगेच धूम ठोकली. परंतु, पोलिसांनी पाठलाग करत चार आरोपी महिलांना पकडले. उर्वरित दोघी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
ही घटना कल्याणपूर पोलीस ठाण्यात घडली. येथील मालखान्यात जप्त करण्यात आलेल्या दारूची कचरा गोळा करणाऱ्या चार महिलांनी चोरी केली. मात्र दारू चोरणाऱ्या महिलांवर एका पोलिसाची नजर पडली. यानंतर पोलिसांनी पाठलाग करून चार महिलांना अटक केली. मात्र, दोन महिला पळून जाण्यात यशस्वी झाल्या. गोदामातून चोरलेल्या दारूच्या बाटल्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. कचरा गोळा करणाऱ्या महिलांनी मंगळवारी ही चोरी केली. आरोपी महिलांमध्ये रूपा देवी, सीता देवी, झीनत परवीन आणि शनिचरी देवी यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालखान्यातून दारू चोरल्यानंतर महिलांनी ती पोलिस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या झाडांच्या आड लपवून ठेवली होती. महिलांनी चौकशीदरम्यान माहिती दिल्यानंतर पोलिसांनी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. यासंदर्भात डीएसपी म्हणाले, कचरा गोळा करणाऱ्या महिलांनी 16 लिटर दारू चोरली होती, जी जप्त करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेज
पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरीत सहभागी असलेल्या इतर महिलांची ओळख पटवली जात आहे. लवकरच सर्वांना अटक करण्यात येईल. कल्याणपूर पोलीस ठाण्याच्या मागील हद्दीत पडलेल्या झाडाच्या साहाय्याने पोलीस ठाण्याच्या आवारात प्रवेश केल्याचे अटक करण्यात आलेल्या चार महिलांनी सांगितले. त्यानंतर किचनच्या खिडकीतून दारूच्या बाटल्या चोरल्या. काही महिला खिडकीतून दारूच्या बाटल्या काढत होत्या, तर काही त्या बाहेर नेत होत्या. भिंतीपलीकडे उभ्या असलेल्या महिला त्या लपवण्याचे काम करत होत्या.
पोलिसाने आवाज केला
मात्र, महिलांची ही कृती एका पोलिसाच्या लक्षात आली. तो लगेच आवाज करू लागला. पोलिसाचा आवाज ऐकून बाकीचे पोलीस धावत मालखान्याच्या मागे पोहोचले. पोलिसांना येताना पाहून महिला धावू लागल्या, त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून चार महिलांना अटक केली. तर दोन महिला पळून जाण्यात यशस्वी झाल्या. या दोघींना अटक करण्यासाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे.