अमरावती : आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अनंतपल्ली परिसरात एक रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात सात कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या एका ट्रकची समोरून जाणाऱ्या टाटा एस छोटा हत्ती वाहनाला धडक बसल्याने हा अपघात झाला. त्यामुळे छोटा हत्ती पलटी होऊन बॉक्समध्ये ठेवलेले पैशांचे बंडल रस्त्यावर पडले.
अपघातादरम्यान ड्रायव्हरला वाचवण्यासाठी स्थानिक लोक गाडीजवळ पोहोचले, तेव्हा त्यांना पैशांचे बंडल पाहून आश्चर्य वाटले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबद्दल माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, हे वाहन विजयवाडाहून विशाखापट्टणमला जात होते.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता उलटलेल्या टाटा एस छोटा हत्ती वाहनातील 7 बॉक्समध्ये मोठी रक्कम सापडली. ही रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. जप्त केलेली रोकड केमिकल पावडरच्या पिशव्यांमध्ये गुंडाळल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात छोटा हत्ती चालक वीरभद्र राव किरकोळ जखमी झाला आहे.
दरम्यान पोलिसांनी जप्त केलेली रोकड वीरवल्ली टोल प्लाझा येथे नेली. वीरवल्ली टोल प्लाझा येथे फ्लाइंग स्क्वॉडच्या मदतीने मोजणी यंत्राचा वापर करून रोख मोजणी करण्यात आली. मात्र, घटनेची संपूर्ण माहिती मिळण्यास अजून वेळ लागणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
#WATCH | Andhra Pradesh: Rs 7 Crores cash, kept in seven boxes, seized in East Godavari district.
A vehicle had overturned after being hit by a lorry at Anantapally in Nallajarla Mandal. Locals noticed that 7 cardboard boxes, containing cash, were being transferred in that… pic.twitter.com/KbQmb5M175
— ANI (@ANI) May 11, 2024
रोकड आयकर विभागाकडे सुपूर्द
या प्रकरणी डीएसपी रामाराव यांनी सांगितले की, वाहनातून सापडलेल्या 7 बॉक्समध्ये एकूण 7 कोटी रुपये आहेत. हैदराबादमधील नचाराम केमिकल इंडस्ट्रीमधून मंडापेठ येथील माधवी ऑईल मिलमध्ये पैसे हस्तांतरित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जप्त केलेली रोकड आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.