पुणे : युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटीमध्ये नुकतेच रुजू झालेले भारतीय सैन्य दलातील कर्नल वैभव अनिल काळे ( वय-46 ) यांना वीरमरण प्राप्त झालं आहे. कर्नल वैभव काळे हे गाझा येथून रफा येथील युरोपियन रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झालं, अशी माहिती पुढं येत आहे.
वैभव काळे हे मूळ पुण्याचे रहिवासी आहे. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुले आहे. ते 11 जम्मू-का प्रेर रायफल्समध्ये कार्यरत होते. 22 वर्षांच्या सेवेनंतर 2022 मध्ये त्यांनी भारतीय सैन्य दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते दोन वेगवेगळ्या खासगी कंपन्यांत उच्च पदावर सेवेत होते. मात्र नोकऱ्या सोडून त्यांनी संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांतर्गत ‘यूएनडीएसएस’मध्ये सेवा सुरू केली.
इस्रायल आणि हमास हल्ल्यातील हा पहिला आंतरराष्ट्रीय बळी मानला जात आहे. या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला आहे. वैभव काळे यांची पहिलीचं पोस्टिंग ही गाझापट्टीत रफाह इथं झाली होती. मात्र गाझामध्ये रफाह इथं जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांना वीरमरण आलं. याबाबतची माहिती यूएन विभागाच्या माध्यमातून एक्सवर पोस्ट करत देण्यात आली आहे.