Republic Day : नवी दिल्ली: यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी जोरदार तयारी सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळं भारताच्या प्रजासत्ताक दिनासाठी मुख्य अतिथी म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी उपलब्धता दर्शवली नाही. त्यामुळं आता प्रजासत्ताक दिनासाठी मुख्य अतिथी म्हणून कोणाला निमंत्रण जाणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. आता यावरूनही पडदा उठला आहे. यंदाच्या म्हणजेच 2024 या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी भारताकडून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून हे वृत्त समोर आले आहे. त्यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केल्यास फ्रान्सचे पंतप्रधान सहाव्यांदा या सोहळ्यासाठी हजर राहणार आहेत. इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यापूर्वी फ्रान्सचे माजी पंतप्रधान जॅक शिराक यांनी 1976 आणि 1998 मध्ये प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली होती. शिवाय फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष व्हॅलेरी गिस्कार्ड डी’एस्टिंग, निकोलस सारकोजी, फ्रॅन्कोइस होलांड यांनीसुद्धा अनुक्रमे 1980, 2008 आणि 2016 या वर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी हजेरी लावली होती.
गेल्यावर्षी 2023 या वर्षासाठी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं अयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी इजिप्तचे राष्ट्रध्यक्ष अब्देह अल सिसि हे 74 व्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे होते. यंदाच्या वर्षी बायडेन यांची प्रमुख अतिथी म्हणून हजेरी अपेक्षिक होती. पण, अनुपलब्धतेमुळं आता ते या सोहळ्यासाठी येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात खास नातं आहे. सप्टेंबर महिन्यात ते भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी ते जी 20 परिषदेत सहभागीसुद्धा झाले होते, यादरम्यान भारत आणि फ्रान्स या दोन्ही राष्ट्रांमधील नातेसंबंध सुधारण्यावरील चर्चा आणि भविष्यातील आराखड्यांवर भर देण्यात आला होता.