इस्लामाबाद: पहिल्याच प्रसुतीदरम्यान महिलेने एकापाठोपाठ ६ मुलांना जन्म दिल्याची घटना रावळपिंडीत शुक्रवारी सकाळी घडली आहे. डॉक्टरांनी या बाळांना इनक्यूबेटरमध्ये ठेवले आहे. मातेसह चार मुले व दोन मुली ठणठणीत असल्याची माहिती समोर येत आहे.
पाकिस्तानमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हजारा कॉलनीत राहणार्या मोहम्मद वहिद यांच्या 27 वर्षांच्या झीनत नावाच्या पत्नीने या बाळांना जन्म दिला. झीनत यांना प्रसूतीवेदना सुरू झाल्यावर गुरुवारी या महिलेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, प्रसूतीमध्ये गुंतागूंत निर्माण होऊ शकते, हे लक्षात आल्यावर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम बनवण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी तासाभरात एका पाठोपाठ एक अशा सहा बाळांना जन्म दिला. त्यांच्या पतीने एकाच वेळी इतक्या अपत्यांचा बाप बनल्याने आनंद व्यक्त केला आहे.
या सहा बाळांमध्ये चार मुले व दोन मुली आहेत. या सर्व सहा बाळांचे वजन दोन पौंडपेक्षा कमी आहे. मात्र, सध्या त्यांची आणि आईची तब्येत ठीक आहे, असे जिल्हा रुग्णालयाच्या मेडिकल सुपरिटेंडंट डॉ. फरजाना यांनी सांगितले आहे.