जयपूर: राजस्थानच्या निवडणुकीत भाजप विजयी होत असला तरी 26 वर्षीय उमेदवार रवींद्र सिंग भाटी यांनी दोन्ही प्रमुख पक्षांची अवस्था खराब केली आहे. बाडमेरच्या शिव मतदारसंघातून रवींद्र सिंह भाटी 32000 हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. दुपारी 2 वाजताच्या ट्रेंडनुसार, राजस्थानमध्ये भाजप 113 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 70 आणि इतर 16 जागांवर आघाडीवर आहेत.
रवींद्र सिंह भाटी हे विद्यार्थी नेते असून निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु, त्यांच्या जागी पक्षाने स्वरूप सिंह यांना तिकीट दिल्यावर त्यांनी अवघ्या 9 दिवसांनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.
शिव जागेवर चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. आघाडीचे रवींद्र सिंग भाटी हे अपक्ष आहेत आणि त्यांना भाजपचे स्वरूप सिंग, काँग्रेसचे अमीन खान आणि दुसरे अपक्ष फतेह खान यांचा सामना करावा लागला.
2018 च्या विधानसभा निवडणुकीत शिव मतदारसंघातून काँग्रेसचे अमीन खान विजयी झाले होते. भाटी हे विद्यार्थ्यांच्या हक्कांबाबत आवाज उठवत आहेत, त्यामुळे ते मतदारसंघातील मतदारांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. ते गर्दी खेचणारे नेते आहेत आणि त्यांच्या रॅलींमध्ये चांगला सहभाग दिसून आला आहे.
सुरुवातीच्या ट्रेंडनुसार रवींद्र सिंग भाटी हे आघाडीवर आहेत. निवडणुकीदरम्यान भाटी यांचे अनेक जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यातील एका व्हिडिओमध्ये भाटी त्यांच्या मित्रांसोबत गायिका सपना चौधरीच्या गाण्यावर डान्स करताना दिसले होते. राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर रोजी मतदान झाले असून मतमोजणी अजूनही सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार राज्यात भाजप आघाडीवर आहे. या राज्यात दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याचा ट्रेंड दिसून आला आहे. ही 1993 पासूनची परंपरा आहे.