लखनऊ : श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास (वय ८६) यांना उत्तरप्रदेशच्या लखनौमधील मेदांता रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर देखरेख ठेवून आहे. दास हे मूत्राशयासंबंधी त्रासाने पीडित आहेत. कृष्णजन्माष्टमी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ते २४ ऑगस्ट रोजी मथुरेला गेले होते. यानंतर भाविकांना भेटण्यासाठी ते ग्वालियरमध्ये गेले. याठिकाणी प्रकृती बिघडल्याने त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पण प्रकृती आणखी खालावत चालल्याने त्यांना रविवारी सायंकाळी लखनौमधील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांना मूत्राशय आणि खाण्यासंबंधी त्रास होत असल्याचे मेदांतातील डॉक्टरांनी सांगितले. २०१९ पासून यामुळे त्यांना अनेकवेळा मेदांतामध्ये दाखल करण्यात आलेले आहे. महंत नृत्य गोपाल दास हे छावणी मंदिर आणि राम जन्मभूमी न्यासचे प्रमुख आहेत. बाबरी मशीद पाडल्यानंतर जानेवारी १९९३ मध्ये विश्व हिंदू परिषदेने राम जन्मभूमी न्यासची स्थापना केली होती.