नवी दिल्ली : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. २७ फेब्रुवारीला राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणीही होईल. रिक्त होणाऱ्या ५६ पैकी ६ जागा महाराष्ट्रातील आहेत.
महाराष्ट्रात ६ जागांसाठी मतदान होणार
१३ राज्यांतील ५० राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी तर २ राज्यांतील उर्वरित ६ सदस्यांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो.
राज्यातील खासदारांचे काय होणार?
राज्यसभेतील 68 खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यात 9 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. तर 68 पैकी 6 खासदार हे महाराष्ट्रातील आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचा समावेश आहे. या खासदारांना पुन्हा संधी मिळणार? की पक्षाकडून त्यांना नारळ देण्यात येणार? याबाबत अनेक चर्चा करण्यात येत आहेत.
प्रकाश जावडेकरांची संधी जाणार?
“प्रकाश जावडेकर यांची सध्याची कामगिरी पाहता त्यांना पक्ष खासदाराकीसाठी पुन्हा संधी देईल, असे वाटत नाही. कारण ते जर अॅक्टिव असते तर त्यांना मंत्रिपदावरुन काढले नसते. तर अनिल देसाईंना ठाकरे गटाकडून पुन्हा संधी मिळू शकते. कारण अनिल देसाई हे पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे त्यांना संधी मिळू शकते. वंदना चव्हाण यांचे आत्ताच काही सांगता येणार नाही. कुमार केतकर यांना काँग्रेसकडून पुन्हा संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळं केतकरांच्या जागी दुसरा उमेदवार काँग्रेस देईल,” असे देखील राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटले आहे.