अलवर:राजस्थानमधील अलवरमध्ये माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. आधी काही नराधमांनी 23 वर्षांच्या मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर त्यांनी तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. वैतागलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. त्यामुळे नराधम आरोपी आणखीनच आक्रमक झाले. त्यानंतर अचानक एके दिवशी २० हून अधिक नराधम पीडितेच्या घरी आले. याठिकाणी त्यांनी मुलीसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण केली.
मारहाणीत जखमी झालेल्या सर्व लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अलवर येथील राजीव गांधी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांची मुलगी घरी आंघोळ करत असताना गावातील काही गुंडांनी टेरेसवर चढून गुपचूप तिचा व्हिडिओ बनवला. तेव्हापासून ते तरुणीला ब्लॅकमेल करत होते. त्यांना तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते.
याला तरुणीने विरोध केला असता नराधमांनी उघडपणे तिचा विनयभंग सुरू केला. रस्त्याने चालताना ते मुलीची छेड काढत असे. यानंतर अस्वस्थ झालेल्या पीडितेने या प्रकरणाची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. यानंतर मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला.
पीडित कुटुंबावर हल्ला
ही बाब आरोपींना समजताच त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना धमक्या देण्यास सुरुवात केली. खटला मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. मात्र पीडितेने आणि तिच्या कुटुंबीयांनी खटला मागे घेण्यास नकार दिल्याने २० हून अधिक लोकांनी पीडितेवर आणि तिच्या कुटुंबीयांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. शेजाऱ्यांनी घराच्या गच्चीवरून या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. या हल्ल्यात पीडिता, तिचा भाऊ आणि तिची आई यांच्यासह अनेक जण जखमी झाले आहेत.
गुन्हेगारांना लवकरच अटक करण्यात येईल
जखमींना उपचारासाठी काठुमार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती चिंताजनक असल्याने जखमींना अलवर येथे रेफर करण्यात आले. पीडित कुटुंबाने आता न्यायाची मागणी केली आहे. काही गुंड अजूनही त्यांना धमकावत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.