नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी रविवारी पक्षांतर बदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी दिल्याची चर्चा आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्र विधानभवनात झालेल्या ८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी व सचिव परिषदेमध्ये ही घोषणा केली.
बिर्ला म्हणाले की, संसद सदस्यांची कार्यकुशलता वाढवण्यासाठी नियमितपणे राजकीय पक्षांची चर्चा आवश्यक असते. त्यांचे संरक्षक म्हणून पीठासीन अधिकाऱ्यांच्या काही जबाबदाऱ्या असतात. निर्णय असा घेतला जावा की पुढील पीढीला प्रेरणा मिळत राहील. राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे आणि ठाकरे गटाच्या याचिकांवर निर्णय दिला होता. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली होती. त्यानंतर कोणत्या गटाचे आमदार अपात्र आहेत. यावर विधानसभा अध्यक्षांना निर्णय द्यायचा होता. दुसरीकडे, नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट आणि अजित पवार गट यावर सुनावणी करणार आहेत. या संदर्भातील त्यांचा अभ्यास आणि अनुभव पाहता, त्यांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पद आणि सत्तेच्या मोहात पक्ष बदलण्याचा कृतीला थांबवण्यासाठी राजीव गांधी सरकारने १९८५ मध्ये पक्षांतर बंदी कायदा आणला. मर्जीप्रमाणे पक्ष बदलण्याच्या वृत्तीला यामुळे अटकाव झाला, तरी यामध्ये देखील अनेक पळवाटा काढण्यात आल्या आहेत.