नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशभरातील राजकीय पक्ष अंतर्गत बैठका घेऊन भविष्याची रणनीती तयार करत आहेत. सोमवारी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन राहुल गांधी यांच्या संसदीय जागेवर निर्णय घेतला. बैठकीनंतर खरगे म्हणाले की, राहुल गांधी वायनाडची जागा सोडतील आणि रायबरेली स्वतःकडे ठेवतील. यानंतर प्रियांका गांधी वाड्रा या वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार असतील. या बैठकीला सोनिया गांधींसोबत राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि केसी वेणुगोपालही उपस्थित होते.
या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, या निर्णयामुळे मी खूप खूश आहे. वायनाडचे प्रतिनिधित्व करणे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असेल. मी चांगला प्रतिनिधी बनण्याचा प्रयत्न करेन. माझे रायबरेलीशी जुने नाते आहे आणि मी रायबरेली आणि अमेठीसाठी खूप काम केले आहे. रायबरेलीतही मी भावाला मदत करेन. वायनाड आणि रायबरेलीतही आम्ही एकमेकांना मदत करू.
राहुल गांधींनी जिंकलेल्या रायबरेली आणि वायनाडच्या जागेपैकी कोणती जागा सोडायची यासाठी काँग्रेस हायकमांडची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी अधिवेशनातील काँग्रेसच्या रणनीतीबाबतही चर्चा जाळायची शक्यता आहे.