लखनऊ: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मानहानीच्या खटल्याचा सामना करत असलेले राहुल गांधी न्यायालयात हजर राहणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोमवारी (19 फेब्रुवारी) ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, मंगळवारी (20 फेब्रुवारी) राहुल गांधींचा उत्तर प्रदेशातील सुरू असलेला दौरा एका दिवसासाठी थांबवला जाईल. कारण ते (गांधी) सुलतानपूर येथील दिवाणी न्यायालयात मानहानीच्या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध जारी केलेल्या समन्सला उत्तर देण्यासाठी न्यायालयात हजर होतील.
काय प्रकरण आहे?
2018 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात “आक्षेपार्ह” टिप्पणी केल्याबद्दल भाजप नेते विजय मिश्रा यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी सुलतानगंज कोर्टाने राहुल गांधींना समन्स बजावले आहे.
काय म्हणाले जयराम रमेश?
पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले की, भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी आणखी एक ब्रेक घेणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजपच्या एका नेत्याने केलेल्या मानहानीच्या खटल्यात सुलतानपूरच्या दिवाणी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, भाजप नेत्याने 4 ऑगस्ट 2018 रोजी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या संदर्भात, राहुल गांधी यांना उद्या, 20 फेब्रुवारी रोजी सकाळी सुलतानपूर येथील जिल्हा दिवाणी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे भारत जोडो न्याय यात्रा थांबवली जाईल.
2018 मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधी यांनी अमित शाह यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. गुजरातमधील एका चकमक प्रकरणात त्यांनी अमित शहा यांच्यावर हत्येचा आरोप केला होता. गांधींच्या विधानाच्या चार वर्षांपूर्वी, शाह यांची मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने २००५च्या बनावट चकमक प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली होती. त्यावेळी शहा गुजरातचे गृहराज्यमंत्री होते.