नवी दिल्ली: कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाच्या या निर्णयावर भारत सरकारने आश्चर्य व्यक्त केले होते.
भारतीय नौदलाचे हे आठही माजी अधिकारी गेल्या वर्षी ऑगस्टपासून कतारच्या तुरुंगात आहेत. या सर्व माजी अधिकाऱ्यांवर लावण्यात आलेल्या आरोपांची माहिती कतारने अद्याप दिलेली नाही. मात्र, या सर्वांवर हेरगिरीचे आरोप असल्याचे या प्रकरणाशी परिचित लोकांचे म्हणणे आहे.
फाशीच्या शिक्षेला स्थागिती
भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “दहरा ग्लोबल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या माजी नौदल अधिकाऱ्याच्या संदर्भात आजच्या निर्णयाची आम्ही दखल घेतली आहे, ज्यामध्ये शिक्षा कमी करण्यात आली आहे. आम्ही कतारच्या अपील न्यायालयाचा तपशीलवार निर्णयाची वाट पाहत आहोत. आमचे पुढचे पाऊल काय असेल? हे ठरवण्यासाठी आम्ही कायदेशीर टीम तसेच कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आहोत.”
निवेदनात पुढे म्हटले आहे की, “आज कतार कोर्ट ऑफ अपीलमध्ये, आमचे राजदूत आणि इतर अधिकारी दोषी अधिकाऱ्याच्या कुटुंबासह उपस्थित होते. आम्ही खटल्याच्या सुरुवातीपासून त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि यापुढे ही पाठिंबा देत राहू ” तसेच आम्ही कायदेशीर सहाय्य देत राहू. आम्ही हे प्रकरण कतारी अधिकाऱ्यांकडेही मांडत राहू. प्रकरणाचे गांभीर्य आणि आवश्यक गोपनीयता लक्षात घेता, यावेळी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही.”
सर्व माजी अधिकारी खासगी कंपनीत कार्यरत
हे सर्व लोक कतारमधील एका खासगी कंपनीत काम करत होते. ही कंपनी कतारी एमिरी नौदलाला प्रशिक्षण आणि इतर सेवा पुरवते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे नाव Dahra Global Technology and Consultancy Services आहे. कंपनी स्वतःचे वर्णन कतार संरक्षण, सुरक्षा आणि इतर सरकारी संस्थांचे स्थानिक भागीदार म्हणून करते. रॉयल ओमान एअर फोर्सचे निवृत्त स्क्वाड्रन लीडर खामिस अल अजमी हे या कंपनीचे सीईओ आहेत.
कतार पोलिसांनी अटक केलेल्या 8 माजी नौसैनिकांमध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेते कमांडर पूर्णांदू तिवारी (आर) यांचाही समावेश आहे. 2019 मध्ये त्यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, पूर्णांदू तिवारी यांनी भारतीय नौदलात अनेक मोठ्या जहाजांचे नेतृत्व केले आहे.