वायनाड : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींकडे एकूण १२ कोटी रुपयांची संपत्ती असून त्यांचे पती जवळपास ६५ कोटींच्या संपत्तीचे धनी आहेत. केरळमधील वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्जासोबत त्यांनी बुधवारी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. आयकराच्या थकबाकीसह १५.७५ लाख रुपयांची देणेदारी आणि शैक्षणिक तसेच गुन्ह्यांच्या नोंदींचाही उल्लेख प्रियंकांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.
चालू आर्थिक वर्षात बँकेकडून तसेच इतर गुंतवणुकीतून मिळालेले व्याज व भाड्यापोटी एकूण ४६.३९ लाख रुपये कमाई केल्याचे प्रियंका यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, प्रियंकांकडे जवळपास ४.२४ कोटी रुपयांची जंगम, तर ७.७४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. जंगम संपत्तीमध्ये तीन बँक खात्यांतील अनामत रक्कम, म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक, पीपीएफ, पती रॉबर्ट वढेरा यांनी भेट दिलेली होंडा सीआरव्ही कार आणि १.१५ कोटी रुपयांच्या ४४०० ग्रॅमहून जास्त सोन्याचा समावेश आहे. तर स्थावर संपत्तीपैकी नवी दिल्लीच्या मेहरौली भागातील शेतजमिनीतील आणि तेथील फार्महाऊसमधील वाटा आता बाजारमूल्यानुसार २.१० कोटींचा झाल्याचे विवरण प्रियंकांनी प्रतिज्ञापत्रात दिले आहे.
यासोबतच हिमाचल प्रदेशच्या शिमला येथील आपल्या ताब्यातील ५.६३ कोटी रुपयांच्या रहिवासी संपत्तीचाही उल्लेख या प्रतिज्ञापत्रात आहे. प्रतिज्ञापत्रात प्रियंकांनी आपल्या पतीच्या चल व अचल संपत्तीचीही माहिती दिली आहे. रॉबर्ट वढेरांकडे ३७.९ कोटी रुपयांची जंगम संपत्ती व २७.६४ कोटी रुपयांची स्थावर, अशी एकूण ६५.५४ कोटींची संपत्ती आहे. आपल्याविरोधातील २ एफआयआर व वनविभागाने बजावलेल्या नोटीसचाही उल्लेख प्रतिज्ञापत्रात आहे.
यामधील पहिली एफआयआर २०२३ साली मध्य प्रदेशात अपप्रचार करणाऱ्या ट्विटप्रकरणी दाखल आहे. तर दुसरी तक्रार २०२० साली हाथरस येथे निदर्शने करताना कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रियंका व राहुल गांधीविरोधात दाखल करण्यात आली होती. प्रतिज्ञापत्रातील शैक्षणिक माहितीनुसार, प्रियंका यांनी दुरस्त शिक्षणाच्या माध्यमातून ब्रिटनच्या संडरलॅण्ड विद्यापीठातून बुद्धिस्ट विषयातील पदव्युत्तर पदविका मिळवली. तसेच दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्रातील पदवी, बीए ऑनर्स पदवी प्राप्त केल्याचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे.