नवी दिल्ली: : पंतप्रधान आवास योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना रविवारी (दि.१५) देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, रविवारचा हा मुहूर्त टळला असून केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने काढलेल्या पत्रानुसार आता हा हप्ता मंगळवारी (दि. १७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवशी वितरीत करण्यात येणार आहे.
राज्याचे ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे संचालक डॉ. राजाराम दिघे यांनी पत्राद्वारे याबाबतच्या सूचना जिल्हा परिषदांना केल्या आहेत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलासाठी निधी देण्यात येतो. जिल्ह्यातील लाभार्थ्यांची निश्चिती करण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून पंचायत समिती स्तरावर कामे सुरु होती. यामध्ये आधार प्रमाणीकरण, जागा निश्चिती तसेच लाभाथ्यांचे कागदपत्रांसह अर्ज प्रक्रीया अशा कामांचा समावेश होता.
देशातील १० लाख लाभाथ्यर्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते एका क्लिकवर पहिला हप्ता देण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील अडीच लाख लाभार्थ्यांचा समावेश आहे. तसेच याच कार्यक्रमात कार्यक्रमात दोन वर्षातील पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा-१ अंतर्गत पुर्ण झालेल्या १ लाख १० हजार ८४३ घरकुलांचा गृहप्रवेश होणार आहे. संचालक दिघे यांच्या पत्रानुसार हा कार्यक्रम भुवनेश्वर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि १७) दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले आहे. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी गणपती विसर्जनाचा उत्सव आहे. राज्यातील सर्व नागरिक उत्सवात सहभागी असणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमासाठी घरकुल लाभार्थ्यांची उपस्थिती दर्शविण्यासाठी अधिकाऱ्यांची चांगलीच कसरत होणार आहे.